
रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जाती व समाज घटकांचा केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश व्हावा, या दीर्घकालीन मागणीसाठी महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची विशेष राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उरण येथे आयोजित करण्यात आली आहे. कराडी समाज संघटनेच्या वतीने या महत्त्वपूर्ण बैठकीचे यजमानपद स्वीकारण्यात आले आहे.
बैठकीचे मुख्य उद्दिष्ट संबंधित वंचित ओबीसी समाजांना केंद्र सरकारच्या आरक्षणाचा व योजनांचा लाभ मिळवून देणे हे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन, प्रशासकीय व राजकीय पाठपुरावा, केंद्र व राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेली निवेदने, झालेला पत्रव्यवहार आणि उच्चस्तरीय बैठकांचा समग्र आढावा या बैठकीत घेण्यात येईल.
केंद्रीय ओबीसी सूचीतील समावेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेण्यासाठी केंद्र सरकारवर अधिक प्रभावी दबाव कसा आणता येईल, याचा ठोस कृती आराखडा या वेळी तयार करण्यात येईल. तसेच समाजाच्या हक्कांसाठी राज्यभरात जनजागृती मोहीम राबवण्याबाबत दिशा निश्चित केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, केंद्रीय नोकऱ्या आणि राष्ट्रीय शिष्यवृत्तींचा लाभ मिळवून देणे हा या लढ्याचा मूळ हेतू आहे.
सदर बैठक रविवार, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०० ते ४:०० या वेळेत रेल्वे स्टेशनजवळील हॉटेल आनंदी, उरण (जि. रायगड) येथे पार पडेल. या बैठकीस महाराष्ट्रातील विविध ओबीसी समाजांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार मांडावेत, असे आवाहन महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे आणि कराडी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)