
रत्नागिरी, 2 ऑक्टोबर (हिं.स.) । आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारी आकांक्षा कदम २ ते ५ डिसेंबर या काळात इटली येथे होणाऱ्या नवव्या कॅरम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
देवरूख येथील रहिवासी असलेल्या आकांक्षाला राज्य शासनाच्या शिवछत्रपती सर्वोत्कृष्ट खेळाडू राज्य क्रीडा पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू), रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पदार्पणातच मालदीव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत देशाला सुवर्णपदक व वैयक्तिक सुवर्ण पदक व वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी राज्यस्तरीय महिला ओपन गटाचे विजेतेपद, राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत १ सुवर्ण २ रौप्य पदके, सलग तीन वेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपद, राज्य स्तरावरील महिलांच्या एकेरी ओपन गटाचे १५ वेळा विजेतेपद तिने मिळविले आहे. आतापर्यंत ३६ सुवर्णपदके, १३ रौप्यपदके व १३ कास्य पदके अशी एकूण ६२ पदके तिने मिळविली आहेत. त्यातील ४ सुवर्णपदके व १ रौप्यपदक आंतरराष्ट्रीय पातळीवरील, तर ४ सुवर्णपदके व २ रौप्यपदके राष्ट्रीय स्तरावरील आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी