एशियन क्रीडा स्पर्धा: सुजित कलकलने ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकले सुवर्णपदक
नागोया (जपान), 02 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकल याने शुक्रवारी एशियन गेम्स-२०२६ मध्ये पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुडिएवचा १०-९ असा पराभव केला.
Sports Wrestling Sujeet Gold Asian Games


नागोया (जपान), 02 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकल याने शुक्रवारी एशियन गेम्स-२०२६ मध्ये पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात सुजीतने ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुडिएवचा १०-९ असा पराभव केला. सामन्यात एका वेळी २-९ असा पिछाडीवर असलेल्या सुजीतने सलग ८ गुण मिळवत शानदार पुनरागमन केले.

सुवर्णपदकाच्या मार्गावर सुजीतने अनेक मजबूत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. त्याने अफगाणिस्तानच्या सैयद उमर जाजईविरुद्ध १३-३ अशा तांत्रिक वर्चस्वाने विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने इराणच्या अब्बास इब्राहिमजादेसवादकौहीचा एकही गुण न गमावता तांत्रिक वर्चस्वाच्या आधारे पराभव केला.

उपांत्य फेरीत सुजीतचा सामना जपानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन कोटारो कियोका याच्याशी झाला. चुरशीच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाल्यानंतर निकषाच्या आधारे सुजीतने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

२३ वर्षीय सुजीतसाठी हे पहिले एशियन गेम्स सुवर्णपदक आहे. एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा तिसरा मल्ल ठरला आहे. त्याच्यापूर्वी योगेश्वर दत्तने २०१४ आणि बजरंग पुनियाने २०१८ मध्ये या गटात सुवर्णपदक जिंकले होते. एशियन गेम्स-२०२६ मधील कुस्तीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदकही आहे.

हरियाणातील इमलोटा गावचा रहिवासी असलेल्या सुजीतचा जन्म ५ नोव्हेंबर २००२ रोजी झाला. त्याचे वडील दयानंद कलकल हे राष्ट्रीय स्तरावरीलकुस्तीपटू राहिले आहेत. सुजीतने गावातील आखाड्यातून कुस्तीची सुरुवात केली आणि २०२१ मध्ये सोनीपत येथे जाऊन अनुभवी कुस्तीपटूंकडून प्रशिक्षण घेतले.

सुजीतने २०२२ मध्ये अंडर-२३ आणि अंडर-२० एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्याने ट्युनिस येथे यूडब्ल्यूडब्ल्यू रँकिंग सिरीजमध्ये सुवर्णपदक मिळवले. २०२५ मध्ये त्याने अंडर-२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अंडर-२३ एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. २०२६ मध्ये वरिष्ठ एशियन चॅम्पियनशिपच्या ६५ किलो गटाचे विजेतेपद मिळवत त्याने आपली मजबूत दावेदारी सिद्ध केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande