कांगोमध्ये इबोलाचा कहर; मृतांचा आकडा ४ हजारांच्या पार, ८३०० हून अधिक रुग्ण
किंशाना, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य आफ्रिकेतील कांगो या देशात धोकादायक इबोला विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात इबोलामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडली
कांगोमध्ये इबोलाचा कहर; मृतांचा आकडा ४ हजारांच्या पार,     ८३०० हून अधिक रुग्ण


किंशाना, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।मध्य आफ्रिकेतील कांगो या देशात धोकादायक इबोला विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात इबोलामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ हजारांचा टप्पा ओलांडली आहे. या धोकादायक संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, आतापर्यंत इबोला विषाणूचे ८ हजार ३०० हून अधिक पुष्टी झालेले रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ हजार १८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे हे प्रमाण जवळपास निम्मे आहे. त्यामुळे हा विषाणू किती घातक ठरत आहे, याची कल्पना येते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा इतिहासातील सर्वात वेगाने पसरणारा इबोला उद्रेक ठरला आहे. विशेष म्हणजे, कांगोमध्ये यावेळी झालेल्या इबोला उद्रेकामागे अत्यंत दुर्मिळ असलेला ‘बुंडीबुग्यो विषाणू’ हा प्रकार कारणीभूत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या दुर्मिळ विषाणूविरुद्ध सध्या कोणतेही ठोस उपचार किंवा प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हा विषाणू वेगाने पसरत असून नव्या आरोग्य क्षेत्रांमध्येही त्याचा फैलाव होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. भौगोलिक क्षेत्रात विषाणूचा सातत्याने विस्तार होत असल्याने तेथील मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि मदत पथकांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, विषाणूचा वेगाने होणारा प्रसार आरोग्य अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने आणखी वाढवत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande