मध्यपूर्वेत अमेरिकेची तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल होणार; १० हजार अतिरिक्त सैनिकांची तैनाती
वॉशिंग्टन, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिका मध्यपूर्वेतील आपली लष्करी ताकद आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आ
मध्यपूर्वेत अमेरिकेची तिसरी विमानवाहू युद्धनौका दाखल होणार; १० हजार अतिरिक्त सैनिकांची तैनाती


वॉशिंग्टन, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिका मध्यपूर्वेतील आपली लष्करी ताकद आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. अमेरिका या भागात आपली तिसरी विमानवाहू युद्धनौका आणि सुमारे ९ हजार ते १० हजार अतिरिक्त सैनिक पाठवणार आहे.

‘यूएसएस थियोडोर रूझवेल्ट’ आणि त्याचा स्ट्राइक ग्रुप नोव्हेंबरअखेरपर्यंत मध्यपूर्वेत पोहोचणार आहे. सध्या या भागात ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ आणि ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ या दोन विमानवाहू युद्धनौका आधीपासूनच तैनात आहेत. यापैकी ‘यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ची नेहमी प्रशांत महासागरात तैनाती केली जाते. मात्र, दीर्घकाळाच्या तैनातीनंतर ‘यूएसएस अब्राहम लिंकन’ला विश्रांती देण्यासाठी ती मध्यपूर्वेत पाठवण्यात आली आहे.या नव्या तैनातीमुळे मध्यपूर्वेत अमेरिकन नौदलाची उपस्थिती अभूतपूर्व पातळीवर वाढणार आहे. या भागात २० हजारांहून अधिक नौसैनिक आणि मरीन जवानांसह शेकडो लढाऊ विमाने तैनात असतील.

दरम्यान, गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेत (यूएनजीए) इराणने कतारी मध्यस्थांच्या माध्यमातून अमेरिकेला पाठवलेल्या शांतता प्रस्तावाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणला तातडीने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी करार करायचा आहे, कारण त्यांचा मोठ्या प्रमाणात पराभव होत आहे.

दरम्यान, बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी अलीकडे फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेचाही उल्लेख केला. या विमानात सहपायलटने कॅप्टनवर चाकूने हल्ला केला होता.या हल्ल्याचा इराणशी संबंध आहे का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “मी जे ऐकत आहे त्यावरून माझे उत्तर होय असेल. मात्र, आम्ही अद्याप याबाबत तपास करत आहोत,” असे सांगितले.

या घटनेबद्दल अमेरिका इराणविरोधात प्रत्युत्तराची कारवाई करणार का, असे विचारले असता ट्रम्प यांनी इशारा देत म्हटले, “अगदी जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, काळजी करू नका.”मात्र, या घटनेत इराणचा सहभाग असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande