
लातूर, २ ऑक्टोबर (हिं.स.) : लातूर शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बाभळगाव चौक ते राजीव गांधी चौक मार्गावरील रिंग रोड परिसरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच हसन शेख हा घटनास्थळावरून पसार झाला.
रिंग रोडवरील गोजमगुंडे मंगल कार्यालयाच्या बाजूला लगजकर यांच्या शेतातील मोकळ्या जागेतील झाडीमध्ये काही जण तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीची खात्री करून पंचांना सोबत घेत पोलिसांच्या पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी १० जण दोन गोलाकार रिंगणात बसून तिर्रट जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच दुसऱ्या रिंगणातील हसन शेख, रा. लातूर, हा घटनास्थळावरून फरार झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या अंगझडतीत तसेच दोन्ही रिंगणांच्या मध्यभागातून जुगाराचे पत्ते आणि रोख रक्कम असा एकूण ७२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे
याप्रकरणी पोलिसांनी अमजद बाबू पठाण (वय ३२), वैजनाथ नागनाथ काळे (वय ३५), बलदेव रामसिंग बावरी (वय ३२), बबलू सुरेश गायकवाड (वय ३३), शिवा बाबुसिंग बावरी (वय २७), सिद्धार्थ संजय सिरसाट (वय २६), जमीर गौस बागायन (वय २४),
नवीन रविंद्र लोंढे (वय २८), अजय आनंद कांबळे (वय २५), याजीद हाकानी शेख (वय ३४) यांना ताब्यात घेतले असून हसन शेख नावाचा एक आरोपी फरार आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात सपोनि पांडुरंग माने, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, विनोद चलवाड, मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, जमीर शेख, प्रेमदास राठोड, प्रविण कोळसुरे आणि तुळशीराम बरुरे यांचा समावेश होता.
लातूर जिल्ह्यातील अवैध जुगार, मटका तसेच अन्य अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई सुरू असून, अशा गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis