रायगड : गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची १५.७४ कोटींची कमाई
रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘उमेद’ अभियानाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील २४७ महिला बचतगटांनी त
Raigad-Self-help-groups-earn-


रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘उमेद’ अभियानाने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील २४७ महिला बचतगटांनी तब्बल १ लाख ५७ हजार ६१२ गणेशमूर्तींची विक्री करत १५ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. या यशात मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्याने सर्वाधिक वाटा उचलत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सुबक आखणी, नेटकी बैठक, रेखीव डोळे आणि आकर्षक रंगकामासाठी प्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले असून त्यांना देश-विदेशात मोठी मागणी असते. यंदा या पारंपरिक व्यवसायात पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महिला बचतगटांनी मोठ्या आत्मविश्वासाने सहभाग घेतला. उमेद अभियानामार्फत महिलांना फिरता निधी, ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांकडून पतपुरवठा उपलब्ध झाल्याने या व्यवसायाला मोठी आर्थिक ताकद मिळाली.

जिल्ह्यात झालेल्या एकूण विक्रीत पेण तालुक्यातून सर्वाधिक १ लाख ४९ हजार ५०५ मूर्तींची विक्री होऊन १४ कोटी २७ लाख ५५ हजार रुपयांचा व्यवसाय झाला. त्याखालोखाल माणगाव तालुक्याने ३४.७५ लाख, मुरुड ३३.६५ लाख, खालापूर १९.७५ लाख, कर्जत १३.४३ लाख आणि उरण तालुक्याने ११.६० लाख रुपयांची उलाढाल नोंदवली. तसेच अलिबाग, सुधागड, पनवेल, श्रीवर्धन, रोहा, तळा आणि महाड तालुक्यांतील बचतगटांनीही समाधानकारक व्यवसाय केला. सणासुदीच्या काळात महिलांनी साधलेली ही कोटींची उलाढाल ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक भक्कम आणि प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande