बनावट अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल प्रकरणी जरांगेंच्या समर्थकांवर अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे
जालना, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटीतील घडामोडींना वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सक्रिय मराठा आंदोलक महिला
मनोज जरांगे ललिता तारख


जालना, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र ठरलेल्या अंतरवाली सराटीतील घडामोडींना वेगळे आणि गंभीर वळण लागले आहे. आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सक्रिय मराठा आंदोलक महिला ललिता तारख यांना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ करणे, धमक्या देणे तसेच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांचे बनावट अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी 10 ते 11 जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जरांगे पाटील यांच्या समर्थक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट्स करण्याव्यतिरिक्त निनावी फोन कॉल्सवरून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि हातपाय तोडण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगितले. तारख यांनी केवळ कारवाईचीच मागणी केली आहे.

ललिता तारख यांनी यापूर्वी दोन वेळा पोलिसांत धाव घेतली होती. अखेर त्यांनी सादर केलेले संशयित सोशल मीडिया प्रोफाइल्स, कमेंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि धमकीच्या ऑडिओ कॉल्सचे तांत्रिक पुरावे तपासून अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजेस चालवणाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे दाखल झालेल्या समर्थकांमध्ये भगवानराव जाधव, डी.ए. उंबरे पाटील, बिबीशन लिंबाजी नन्नावरे, बळीराम मोरे, संतोष पाटील राहटिकर यांसह अन्य पाच ते सहा अज्ञात समर्थकांचा समावेश आहे.

ललिता तारख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. AI निर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी केल्याचा आणि धमक्या दिल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे. धमक्या देणाऱ्यांवर आणि बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि 2023 पासून माझ्यासह सर्वांच्या संपत्तीची चौकशी करण्याची ललिता तारख यांनी मागणी केली आहे.

सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे संपूर्ण कुटुंब तीव्र मानसिक त्रासाखाली असून, माझ्या जिवाला व सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी ललिता तारख यांनी संशयित सोशल मीडिया अकाउंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि आलेल्या फोन कॉल्सचे पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. धमकी देणाऱ्यांवर आणि AI चा गैरवापर करून बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande