

रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या वतीने उरण पंचायत समिती कार्यालयासमोर विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विस्थापित कुटुंबांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून नियमानुसार तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी ठाम भूमिका या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली.
संघटनेने प्रशासनाला दिलेल्या सविस्तर निवेदनात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर असणाऱ्या काही कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शनच्या खर्चासाठी ओएनजीसी (ONGC) कंपनीच्या सीएसआर निधीतून तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच हनुमान कोळीवाडा प्रशासकीय ग्रामपंचायत, संबंधित ग्रामसेवक आणि तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्या कारभारावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, असा आग्रह धरण्यात आला.
हनुमान कोळीवाडा गावातील मुख्य पाणीपुरवठा वाहिनीवरून बाहेरील कुटुंबांना देण्यात आलेली नळ जोडणी त्वरित खंडित करावी, दुसऱ्या आळीच्या लाईनवरून विनापरवानगी घेतलेल्या कनेक्शनची चौकशी करावी आणि ग्रामनिधीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मा. उच्च न्यायालयाच्या याचिका क्र. WP NO. 8655 OF 2025 मधील २९/०४/२०२६ आणि ३०/०९/२०२६ च्या आदेशांचे काटेकोर पालन करून संक्रमण शिबिरासाठी १.७ कि.मी. लांबीची व ४ इंच व्यासाची नवीन पाईपलाईन टाकून नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या आंदोलनात संघटनेच्या पदाधिकारी कल्याणी परमानंद कोळी, उज्वला रमेश कोळी, आरती जयेश कोळी यांच्यासह स्थानिक महिला, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाची तत्काळ दखल: उपोषणाची गांभीर्याने दखल घेत उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, सभापती महेश म्हात्रे आणि उपसभापती परेश ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर महिला संघटनेने आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरच होईल, असा विश्वास या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)