रायगड - वाहतूक पोलिसाने संपवले जीवन; पोलीस दलात खळबळ
रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर तालुक्यातील सडवली फाट्यासमोरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये एका वाहतूक पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर)
Traffic-police-officer-ends-li


रायगड, 02 ऑक्टोबर (हिं.स.)।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर तालुक्यातील सडवली फाट्यासमोरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये एका वाहतूक पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सातारा आणि रायगड पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील वाहतूक पोलीस संतोष रामचंद्र नलावडे हे काही घरगुती कारणावरून ३० सप्टेंबर रोजी पोलादपूर येथे आले होते. ते सडवली फाट्यावरील जोगळे लॉजमधील रूम नंबर चारमध्ये मुक्कामी होते.

शुक्रवारी सकाळी लॉजचा कर्मचारी त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी देण्याकरिता गेला असता रूम नंबर चारचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. कर्मचाऱ्याने वारंवार हाका मारूनही आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने कर्मचाऱ्याने दरवाजा लगतच्या खिडकीची काच सरकवून आत पाहिले असता, संतोष नलावडे यांनी छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आणि ते मृतावस्थेत लटकलेले असल्याचे निदर्शनास आले.

कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलादपूर पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने नलावडे यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला. नातेवाईक आल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे व पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचा संशय असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande