डोंबिवली - बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या
डोंबिवली, 20 ऑक्टोबर, (हिं.स.)। बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर टाकल्याच्या प्रकरणात तब्बल २८ वर्षांनंतर डोंबिवली जीआरपी पोलिसांनी मुख्य आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. संदीप कृष्णन असे अटक करण्यात आल
डोंबिवली - बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या


डोंबिवली, 20 ऑक्टोबर, (हिं.स.)। बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेव्हण्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळांवर टाकल्याच्या प्रकरणात तब्बल २८ वर्षांनंतर डोंबिवली जीआरपी पोलिसांनी मुख्य आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. संदीप कृष्णन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

१४ डिसेंबर १९९८ रोजी डोंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर शैलेश मोरे यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तपासादरम्यान मोरे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलीस तपासानुसार, शैलेश मोरे यांनी संदीप कृष्णन याच्या बहिणीला घटस्फोट दिल्यामुळे दोघांमध्ये वाद होता. याच रागातून संदीप कृष्णन आणि त्याचे दोन साथीदार विनोद यादव व विनेश कृष्णन यांनी पार्टीच्या बहाण्याने शैलेश मोरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर तिघांनी मिळून गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर हा प्रकार रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी मोरे यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने तपासाला बराच कालावधी लागला. अखेर डोंबिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कृष्णन याचा शोध घेऊन त्याला बिहारमधून अटक केली. अटकेनंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील विनोद यादव आणि विनेश कृष्णन हे अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande