
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। गांजा विक्री करणाऱ्या दोन जणांकडून चार किलो गांजा सह सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते नांदगाव व चांदवड तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, मंगळवारी चांदवड तालुक्यात चांदवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त पणे केली आहे. चांदवड तालुक्यातील वागदर्डी शिवारातील वागदर्डी शिंगवे रस्त्यावर धरणाजवळ दोन व्यक्ती अवैधरित्या गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावरती पोलिसांनी दोन पंच समक्ष खात्री करून पंजा विक्री करण्यासाठी आलेले आनंद पांडुरंग परदेशी ( वय 47 वर्ष रा. संभाजीनगर मनमाड तालुका नांदगाव ) व संजय काशिनाथ शिंदे ( वय 57 वर्ष रा. रापली तालुका चांदवड जिल्हा नाशिक ) यांना ताब्यात घेऊन दोन पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात 4 किलो 351 ग्रॅम गांजा (95,722 रु) व सुझुकी बर्गमॅन मोटार सायकल क्रमांक एम एच. 41 - बी डब्ल्यू . 8808 व बजाज कंपनीची प्लॅटिना मोटर सायकल क्रमांक एम एच 41 - बी झेड 9488 या दोन गाड्या असा एकुण तीन लाख 15 हजार 722 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी जप्ती पंचनामा करून आरोपी आनंद पांडुरंग परदेशी , संजय काशिनाथ शिंदे यांचे विरुद्ध ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दत्ता निराबा कांभिरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चांदवड पोलीस ठाणे येथे अमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI