
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर (हिं.स.) । वेरवली (ता. लांजा) येथील रामगाव-लाडवाडीतील ज्येष्ठ महिला वैशाली विलास हेगिष्टे (वय ७५ वर्षे) यांचा खून करून सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत ताब्यात घेतले.
लांजा उपविभाग सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या तीन पथकांनी समन्वयाने ही कारवाई केली. स्थानिक माहितीच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण आणि तीन स्वतंत्र तपास पथकांनी केलेल्या समन्वित व वेगवान कारवाईमुळे या गुन्ह्याची तातडीने उकल करण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.
काल, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वैशाली विलास हेगिष्टे आपल्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला. त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या व दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेऊन, त्यांच्या हातात नकली बांगड्या घालून संशयिताने पोबारा केला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्यानुसार तातडीने तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी स्थानिक माहितीचे संकलन, संशयितांची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषण यावर भर दिला. विविध दिशांनी समांतर तपास करून उपलब्ध माहितीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान कर्जबाजारीपणामुळे आपण गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले. त्याला अटक करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी