
म्हाडा कॉलनीच्या टाकीतून प्रत्यक्ष टेस्टिंग यशस्वी
छत्रपती संभाजीनगर, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : सातारा परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, म्हाडा कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून वितरण वाहिन्यांमध्ये पाणी सोडून प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात पाणी पोहोचल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.
सातारा परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा, यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे यांच्यासह परिसरातील नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पाणीपुरवठा यंत्रणेची चाचणी यशस्वी झाल्याने या भागातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पुढील टप्प्यात परिसरातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा यंत्रणेची चाचणी घेणे, चौकाचौकांतील पाइपलाइनची जोडणी करणे तसेच अपूर्ण जोडण्या व गॅप भरण्याची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही कामे पूर्ण करून परिसरातील नागरिकांपर्यंत पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे, नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे, नगरसेवक पदमसिंग राजपूत, नगरसेविका सविता कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते राजीव थिटे पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis