पावसाच्या खंडामुळे महाडमधील भातशेती संकटात
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी रायगड, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : महाड तालुक्यात पावसाने वेळेपूर्वीच ओढ दिल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याअभावी उभी भातपिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर
Farming in Mahad hit by heavy rains; demand to assess and provide compensation


तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रायगड, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : महाड तालुक्यात पावसाने वेळेपूर्वीच ओढ दिल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. पाण्याअभावी उभी भातपिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महाड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महाड तालुक्यातील बिजघर परिसरासह विविध भागांत पावसाअभावी भातपिकांची स्थिती चिंताजनक झाली आहे. हाती आलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने यंदाच्या उत्पादनाबाबत शेतकरी चिंतेत आहेत. शेतीच्या मशागतीपासून लागवडीपर्यंत केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याच्या शासनाच्या घोषणेनंतरही प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याबाबत स्पष्टता नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील परिस्थितीप्रमाणेच महाड तालुक्यातील शेतीच्या नुकसानीचाही गांभीर्याने विचार करून संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच, प्रशासनाने बाधित शेतीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचे मूल्यांकन करावे आणि पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.

पावसाच्या खंडामुळे भातशेतीचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आणि प्रस्तावित मदतीबाबतची अनिश्चितता या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande