ठाणे जिल्ह्यात ‘वित्तीय समावेशन संपृक्तता मोहीम’ सुरू
ठाणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार, देशाव्यापी स्तरावर वित्तीय समावेशन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्ह्यात दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत
ठाणे जिल्ह्यात ‘वित्तीय समावेशन संपृक्तता मोहीम’ सुरू


ठाणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) निर्देशानुसार, देशाव्यापी स्तरावर वित्तीय समावेशन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्ह्यात दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष वित्तीय समावेशन संपृक्तता मोहीम (Financial Inclusion Saturation Campaign) राबविण्यात येत आहे. समाजातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत बँकिंग सेवा, विमा संरक्षण, पेन्शन सुविधा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचवून आर्थिक सक्षमीकरण साधणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक (LDM), ठाणे यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि शहरी प्रभागांमध्ये विशेष वित्तीय समावेशन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), विविध शासकीय विभाग, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था सक्रिय सहभाग घेणार आहेत.

मोहिमेचे प्रमुख उद्देश व उपक्रम वित्तीय सेवांचा लाभ अद्याप न मिळालेल्या किंवा अपूर्ण राहिलेल्या पात्र नागरिकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवणे, निष्क्रिय खाती सक्रिय करणे, सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नोंदणी वाढविणे आणि आर्थिक साक्षरता निर्माण करणे यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे.

मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या व्यापक नोंदणीचे व आधार सीडिंगचे काम केले जाईल. तसेच, विशेष लक्ष म्हणून विशेषतः दुर्बल आदिम जमाती (PVTG) कुटुंबांचे शंभर टक्के बँकीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय निष्क्रिय/डॉर्मंट खाती कार्यान्वित करणे, केवायसी (Re-KYC) अद्ययावत करणे, प्रलंबित खात्यांमध्ये सी-केवायसी (C-KYC) आयडी तयार करणे आणि बचत खाते, मुदत ठेव व लॉकर सुविधांमध्ये प्रलंबित नामनिर्देशन (Nomination) अद्ययावत करण्याचे उपक्रम राबविले जातील.

शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी विशेष लक्ष शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी पात्र पीएम-किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुविधेशी जोडले जाणार असून, शेतीसाठी सुलभ व स्वस्त कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. तसेच आगामी रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा संरक्षण सुनिश्चित करून कृषी जोखीम व्यवस्थापनास प्रोत्साहन दिले जाईल.

आपकी पूँजी, आपका अधिकार व सायबर सुरक्षा जनजागृती देशभरात दावा न केलेल्या ठेवी आणि वित्तीय मालमत्तांविषयी जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यादरवारे नागरिकांना आरबीआयचे ‘उद्गम’ (UDGAM) पोर्टल, आयआरडीएआयचे ‘बिमा भरोसा’ पोर्टल आणि सेबीचे ‘मित्र’ (MITRA) पोर्टलबाबत मार्गदर्शन केले जाईल, जेणेकरून बँक ठेवी, विमा दावे किंवा इतर वित्तीय मालमत्तांचा शोध घेणे सुलभ होईल. तसेच, वाढत्या सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ओटीपी, पिन व पासवर्ड सुरक्षितता, फिशिंग कॉल्स ओळखणे आणि सायबर हेल्पलाईन १९३० बाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक शहरी प्रभागात किमान एक शिबिर आयोजित केले जाणार असून, कोणतेही गाव किंवा प्रभाग शिबिराविना राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. नागरिकांनी शिबिरांना येताना आधार कार्ड, पॅन कार्ड (असल्यास), बँक पासबुक, चालू मोबाईल क्रमांक आणि नामनिर्देशनासाठी आवश्यक माहिती सोबत आणावी.

ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला स्वयंसहाय्यता गट सदस्य, कामगार, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी यांनी आपल्या परिसरातील या वित्तीय समावेशन शिबिरांना भेट देऊन योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, ठाणे आणि जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक (LDM), ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande