
लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।
• विक्रमी गाळप विक्रमी ऊस दर हे सूत्र राहणार
• गाळप ऊसाला प्रति टन पहिली उचल ३००० हजार रुपये
विक्रमी गाळप विक्रमी ऊस दर हे सूत्र कायम ठेवून विलास सहकारी साखर (तोंडार, उदगीर) च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ३२०० रुपयांपेक्षा अधिकचा ऊसदर देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज केली.
विलास सहकारी साखर कारखाना उदगीरच्या ऊस मोळी पूजन व गळीत हंगाम २०२६ चा शुभारंभ बुधवार दि. २१ ऑाक्टोंबर रोजी कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख, अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे, कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. वैजनाथ शिंदे, सर्व संचालक यांच्या उपस्थितीत दु्ष्काळी परिस्थितीच्या पाश्वभुमीवर आज अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला.
यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले की, मागच्या काही वर्षात या कारखान्याने अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी आर्थिक क्रांती घडवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, त्यामुळे या परिस्थितीत शेतकरी, मजूर कामगार या सर्वांना आधार देण्याची बांधिलकी हा कारखाना जपणार असल्याचेही याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले.
विक्रमी गाळप विक्रम ऊस दर हे या कारखान्याचे सूत्र राहणार असून दरवर्षीप्रमाणे हा कारखाना उत्कृष्ट कार्यक्षमतेतने चालवून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न करणार आहे. मांजरा परिवाराची ऊसाला उच्चांकी दर देण्याची परंपराही हा कारखाना कायमस्वरूपी जपणार आहे. त्यामुळे मांजरा परिवाराने जाहीर केल्याप्रमाणे हा कारखाना गाळप ऊसाला प्रति टन पहिली उचल ३००० हजार रुपये देणार आहे. शिवाय या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करून ऊसाला प्रति टन ३२०० पेक्षा अधिकचा दर देण्याचा कारखान्याचा मानस आहे. यातून उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा हा कारखाना निश्चितपणे जपणार असल्याचेही याप्रसंगी त्यांनी सांगितले.
आपण उत्पादित केलेल्या ऊसाला सर्वाधिक भाव मिळण्यासाठी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस पुरवठाधारकांनी विलास सहकारी साखर कारखाना, उदगीर या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असे आवाहनही यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शेवटी केले.
यावेळी माजी आमदार तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन वैजनाथ शिंदे, संचालक सर्वश्री रवींद्र व्यंकटराव काळे, नरसिंग दगडू बुलबुले, रसूल दिलदार पटेल, अनंत व्यंकटराव बारबोले, हणमंत नागनाथराव पवार, रणजीत राजेसाहेब पाटील आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते विलास सहकारी साखर कारखान्याच्या च्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis