कर्जतमधील टोरेंटच्या उपसा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी आरक्षण मंजूर
दरवर्षी ३ दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यास मान्यता जलाशय भरण्यासाठी अतिरिक्त २३ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव रायगड, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या टोरेंट कंपनीच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या ‘साईडोंगर-१’ उपसा जल
Water-from-the-Paje-river-vall


karjat


दरवर्षी ३ दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यास मान्यता

जलाशय भरण्यासाठी अतिरिक्त २३ दशलक्ष घनमीटर पाणी राखीव

रायगड, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या टोरेंट कंपनीच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या ‘साईडोंगर-१’ उपसा जलविद्युत प्रकल्पासाठी औद्योगिक वापराकरिता पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यातील उल्हास उपखोऱ्यातील पेज नदी खोऱ्यातून या प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मे. टोरेंट पी.एस.एच. ३ प्रा. लि. या कंपनीच्या प्रकल्पासाठी दरवर्षी ३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणी वापरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, प्रकल्पाच्या प्रारंभी जलाशय भरण्यासाठी तसेच आवश्यकतेनुसार एकवेळ वापरासाठी २३ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

उपसा जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे ‘साईडोंगर-१’ हा प्रकल्प ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या पाणी आरक्षणामुळे कर्जत तालुक्यातील स्थानिक जलस्रोतांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जत तालुक्यातील पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता, शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक गरजा यांच्यात समतोल राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रकल्पासाठी पाणी आरक्षण मंजूर झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाणीवापराला प्राधान्य कसे दिले जाणार, तसेच भविष्यात जलस्रोतांवर कितपत परिणाम होणार, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.स्थानिक पातळीवर पाण्याचे नियोजन, जलस्रोतांचे संरक्षण आणि नागरिकांच्या गरजांचा विचार करून या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande