मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावावे - सचिन अहिर
मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबईतील जुन्या इमारतींचा समूह पुनर्विकास करून रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध भागांतील पुनर्विकासाच्या प्रस्तावांचा विस्तृत आढावा विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला.
मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावावे  -विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश


मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मुंबईतील जुन्या इमारतींचा समूह पुनर्विकास करून रहिवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध भागांतील पुनर्विकासाच्या प्रस्तावांचा विस्तृत आढावा विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला. रहिवाशांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून हॆ प्रस्ताव गतीने मार्गी लावावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील विविध भागांतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी उपसभापती अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी पिंपळेश्वर, इराणी चाळ व वाणी चाळ; सातरस्ता-जेकब सर्कल, धोबी घाट परिसरातील विविध इमारती; उमरखाडीतील म्हाडाच्या ८१ व परिसरातील खासगी इमारती; तसेच परळ-प्रभादेवी येथील जगन्नाथ भाटणकर मार्गावरील रस्तारुंदीमुळे बाधित झालेल्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या प्रस्तावांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली.

बैठकीत संबंधित इमारतींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी उपसभापती अहिर यांनी चर्चा केली. इमारतींचे रहिवासी व पदाधिकाऱ्यांनी पुनर्विकासासंदर्भातील आपल्या अपेक्षा, अडचणी आणि विविध प्रश्न मांडले. उपसभापती अहिर यांनी रहिवासी व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच म्हाडा आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बाजूही जाणून घेतली.

सातरस्ता-जेकब सर्कल परिसरातील विठ्ठल निवास, लक्ष्मीपती बिल्डिंग, म्हाडा, मस्जिद चाळ, रंगवाला बिल्डिंग, झोयेब हाऊस, इस्लामिक बिल्डिंग, वसंत भवन लॉज, साई सागर, आगाखान बिल्डिंग व तयब बिल्डिंग यांसह अन्य इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली. या परिसरातील पुनर्विकासाचे प्रस्ताव पुढे नेण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे निर्देश उपसभापती अहिर यांनी दिले.

उमरखाडीतील म्हाडाच्या ८१ इमारती आणि परिसरातील खासगी इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्तावही बैठकीत चर्चेला आला. या प्रस्तावाबाबत उमरखाडी पुनर्वसन समितीच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेण्यात आली. त्याचप्रमाणे परळ-प्रभादेवी येथील जगन्नाथ भातणकर मार्गावर रस्तारुंदीमुळे बाधित झालेल्या १९ इमारतींच्या समूह पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा झाली.

विविध भागांतील पुनर्विकासाचे प्रस्ताव मार्गी लावताना रहिवाशांचे हित, संबंधित विभागांच्या भूमिका आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही यांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावावेत, असे निर्देश उपसभापती अहिर यांनी दिले.

यावेळी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, एमएमआरडीए तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि समूह पुनर्विकासासाठी प्रस्तावित इमारतींचे रहिवासी व पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande