
उदगीर अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला
लातूर, २२ ऑक्टोबर (हिं.स.)। दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नितेश राजेश राठोड (वय २०, रा. हिवरा, ता. मानोरा, जि. वाशीम) याला उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक १ ने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एल. जी. पाच्छे यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निकाल दिला. न्यायालयाने आरोपीला विविध कलमांखाली एकूण १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
परीक्षा देण्यासाठी गेलेली विद्यार्थिनी बेपत्ता
ही घटना १७ मार्च २०२५ रोजी वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. मात्र, परीक्षा संपल्यानंतरही ती घरी परतली नाही. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला; परंतु ती सापडली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी वाढवणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ६४(२)(i) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत कलम ४, ६ आणि ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध कलमांखाली शिक्षा
न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(i) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, तर कलम ८ अंतर्गत तीन वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. अशा प्रकारे आरोपीला एकूण १५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.
पोलिसांच्या तपासाला यश
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. वाढवणा पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. कलवले यांनी न्यायालयीन कामकाजात सरकारी पक्षाला सहकार्य केले. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी खटल्याच्या कामकाजावर लक्ष ठेवून आवश्यक मार्गदर्शन केले.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. चव्हाण यांनी न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis