
जळगाव, 22 ऑक्टोबर (हिं.स.)चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी परिसरातील शशिकांत नगर येथे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या कारवाईत गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि कार असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत जयेश दिलीप पाटील (वय २४, रा. सुरत, गुजरात) याची झडती घेतली. या झडतीमध्ये एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, ९ एमएमची चार रिकामी काडतुसे, पाच मोबाईल फोन आणि सिमकार्ड आढळून आले. याशिवाय जीजे-०५ आरके-३१२७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कारही पोलिसांनी जप्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री सुमारे आठ वाजता फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक तांत्रिक पुरावे गोळा केले. संशयिताविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर