
नांदेड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। जपान मध्ये झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदकावर भारताचे नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.
सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्या २५ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३६ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे.
सन २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक या पदावर नियुक्ती दिली आहे.
जपान मधील आयची नागोया येथेझालेल्या एशियन पॅरा गेम्स् या स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात ८.१९ मिटर गोळाफेक करून दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक मिळविले आहे.
दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची दुसऱ्यांदा संधी भाग्यश्री जाधव यांना प्राप्त झाली होती.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis