पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर
मुंबई, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि रु.२ लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतक-यांची चौथी यादी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर


मुंबई, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि रु.२ लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतक-यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, अशा एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.तर आज, एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.तरी पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

● या यादीमध्ये एकापेक्षा जास्त बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांचा समावेश करण्यात आला आहे.

◆ या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.

● या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम रु. २ लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.

● योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतक-यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमीत करण्यात आलेली आहे.

● आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande