
उन्हाळ कांदा दरातही ७०० रुपयांनी वाढ
लासलगाव, 22 ऑक्टोबर (हिं.स.)।
: गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला नवीन लाल कांदा अखेर गुरुवारी लासलगाव बाजार समितीत दाखल झाला आहे. यामुळे कांद्याचे दर काही प्रमाणात आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परंतु यावेळी उत्पादन बघता यावरती अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
लाल कांद्याच्या आगमनाने बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले असून, पहिल्याच लिलावात लाल कांद्याला कमाल ३४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याने त्याच्या दरात क्विंटलमागे सुमारे ७०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत गुरुवारी पहिल्या सत्रात २५० वाहनांमधून कांद्याची आवक झाली. नवीन लाल कांद्याला किमान २४०१ रुपये, कमाल ३४०० रुपये, तर सरासरी २५०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याला किमान ९०० रुपये, कमाल ४५७१ रुपये, तर सरासरी ४१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाल्याने आगामी काळात बाजारातील आवक आणि दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पिंपळगाव बाजार समितीत २० ते २२ ऑक्टोबरदरम्यान उन्हाळ कांद्याच्या आवकेत आणि बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळाला. गुरूवारी सरासरी दरात १०० रुपयांची घसरण झाली
दरम्यान लाल कांदा बाजारात आल्यामुळे येणाऱ्या दिवसात कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी देखील उत्पादन किती प्रमाणात होऊन बाजारात दाखल होत त्यावर प्रश्नचिन्ह आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI