
भाविकांना एकाच ठिकाणी मिळणार कुंभमेळ्याची अधिकृत माहिती वाहतूक, सुरक्षा, आरोग्यसेवा आणि डिजिटल सुविधांचा समावेश
नाशिक, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा भाग म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत व विश्वासार्ह माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, तसेच यात्रेचे नियोजन सुलभ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ध्वजारोहण सोहळ्यावेळी या संकेतस्थळाच्या प्राथमिक आवृत्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात संकेतस्थळावर कुंभमेळ्याची मूलभूत माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर विविध डिजिटल सुविधा, अद्ययावत माहिती आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या प्रणालींशी समन्वय साधणाऱ्या सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन आहे.संकेतस्थळावर कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, घाट, आखाडे आणि अन्य धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, अधिकृत सूचना आणि भाविकांसाठी आवश्यक मार्गदर्शनही या माध्यमातून दिले जाणार आहे.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे, रस्ते आणि स्थानिक वाहतुकीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांत वाहनतळ, वाहतुकीतील बदल, प्रवेश व निर्गमन मार्ग, शटल सेवा, पायी जाण्याचे मार्ग आणि सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय यांची माहितीही समाविष्ट करण्याचे नियोजन आहे.
भाविकांना आवश्यक सुविधा सहज शोधता याव्यात, यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र सेवा निर्देशिका विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्नान सुविधा, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, पोलिस चौक्या, मदत कक्ष, हरवले-सापडले केंद्रे, निवास व्यवस्था, अन्नसेवा, वाहनतळ, बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांची माहिती उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.पुढील आवृत्तीत शोध सुविधा आणि डिजिटल नकाशाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणे शोधता येतील, अशी व्यवस्था विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी सुरक्षा व आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित आहे. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आणि अन्य हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना, गर्दी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन आणि प्रतिबंधित वस्तूंची माहितीही या विभागात समाविष्ट केली जाणार आहे.संबंधित यंत्रणांकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतर आणि आवश्यक डिजिटल प्रणाली कार्यान्वित झाल्यावर वाहतुकीतील बदल, हवामानविषयक सूचना, नदीच्या स्थितीबाबतचे इशारे, गर्दीविषयक माहिती आणि अन्य महत्त्वाच्या सूचना संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे नियोजन आहे.
बहुभाषिक आणि सर्वांसाठी सुलभ संकेतस्थळ
देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी संकेतस्थळ बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. संगणक आणि मोबाइलवर सहज वापरता येण्यासोबतच कमी इंटरनेट वेगातही ते कार्यक्षम राहील, याची काळजी घेतली जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसह विविध गरजा असलेल्या वापरकर्त्यांना माहिती मिळवणे सुलभ व्हावे, यासाठी आवश्यक सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.
आभासी सफर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मदत
संकेतस्थळाच्या पुढील आवृत्त्यांमध्ये निवडक घाट, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांची आभासी सफर, ३६० अंश दृश्ये, ध्वनिमार्गदर्शन, व्हिडिओ आणि अधिकृत थेट प्रक्षेपणाच्या लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाविकांना आवश्यक असलेली मार्गदर्शक माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.या संकेतस्थळासोबत मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाविक सहाय्य प्रणाली ‘कुंभदूत’ यांचाही व्यापक डिजिटल व्यवस्थेत समावेश प्रस्तावित आहे. या माध्यमांतून भाविकांना एकसमान, अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विकसित होणारी ही डिजिटल व्यवस्था भाविकांना यात्रेचे नियोजन करण्यासाठी, आवश्यक सुविधांची माहिती मिळवण्यासाठी आणि आपत्कालीन मदत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित झाल्यानंतर कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाला तसेच भाविकांच्या प्रवासाला अधिक सुलभता मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI