
छत्रपती संभाजीनगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी उपलब्ध पीक अवशेषांचा योग्य वापर करावा. चारा उत्पादन, साठवणूक आणि पशुखाद्य व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड शहरातील मतदान केंद्रांना भेटी देत असताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावीर चौक येथे दूध विक्रीसाठी आलेल्या ग्रामीण भागातील दूध उत्पादक पशुपालकांची आकस्मिक भेट घेतली. यावेळी त्यांनी पशुपालकांशी थेट संवाद साधून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता आणि चारा साक्षरता अभियानाबाबत चर्चा केली.
पीक अवशेषांवर प्रक्रिया करून सकस चारा तयार करा
या संवादादरम्यान निकृष्ट चारा सकस बनविण्याच्या विविध पद्धती, युरिया-मोलॅसिस प्रक्रिया, मुरघास निर्मिती, अझोला उत्पादन आणि जलद हिरवा चारा उत्पादनाच्या जलसंवर्धित तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध सोयाबीन कुटार, हरभरा कुटार, गव्हाचे काड आणि इतर पीक अवशेषांवर योग्य प्रक्रिया करून त्यांची पौष्टिकता वाढविता येते. तसेच हिरवा मका व नेपिअर गवतापासून मुरघास तयार करून त्याचा दुष्काळी काळात उपयोग करता येतो. कमी खर्चात अझोला आणि जलसंवर्धित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिरवा चारा उपलब्ध करण्यावरही भर देण्यात आला.
सोयाबीनचे कुटार न जाळता त्याचा पशुखाद्य म्हणून वापर करावा किंवा त्याची विक्री करून आर्थिक लाभ मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. चारा साक्षरता अभियानाच्या माध्यमातून चारा उत्पादन, साठवणूक आणि शास्त्रीय पशुखाद्य व्यवस्थापनाबाबत पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट समन्वय
दूध उत्पादकांच्या विविध समस्या व अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी दूध उत्पादकांच्या व्हॉट्सॲप समूहात जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच पशुसंवर्धन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामुळे दूध उत्पादक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधून समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis