
लातूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि दोन लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या २ हजार ५२९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
आतापर्यंत ३६५.१३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती
या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीमध्ये एकूण ६९ हजार ७९४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या ४८ हजार ८१९ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये आतापर्यंत ३६५.१३ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
चौथी यादी कुठे पाहता येणार?
चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव यादीत आहे का, याची खातरजमा करावी.
शेतकऱ्यांनी पुढे काय करावे?
चौथ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांची कर्जथकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ केले जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्जथकबाकीची खातरजमा करून जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.
राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांच्या बाबतीत ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या हेअरकट धोरणानुसार संबंधित कर्जांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष परिस्थितीतील शेतकऱ्यांसाठीही तरतूद
योजनेतील मयत, वयस्कर किंवा बोटांचे ठसे उमटत नसलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) कार्यवाही करण्यात येणार आहे.
कर्जमुक्तीनंतर नवीन पीककर्जाचे निर्देश
लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांचे आवाहन
चौथ्या यादीत नाव असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी त्वरित जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis