
- ऑडिओ क्लिपवरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) - मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यामागचे षडयंत्र काय? हे तपासले जाणार आहे. या ऑडिओ क्लिपचा पूर्णपणे तपास होईल. आम्हाला सर्वांना प्रश्न पडला आहे की, अडीच वर्षांनंतर ही ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय आहे? कुणाला टार्गेट केले जात आहे? कशासाठी केले जात आहे? या संदर्भात पूर्ण चौकशी करून सत्य आम्ही बाहेर काढू. या ऑडिओ क्लिपची संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही ऑडिओ क्लिप सर्वांना ऐकवून दाखवली होती.
राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची तपासणी एसआयटी करणार आहे. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर सडकून टीका केली. फडणवीसांनी एसआयटीचा खेळ चालवला आहे. एसआयटी काय असते? तुमचाच ढोल आणि तुमच्याच दांडिया. आतापर्यंत फडणवीसांनी ११२ एसआयटी स्थापन केल्या. आल्यापासून ते फक्त एसआयटी स्थापन करत आहेत. फडणवीसांकडून एसआयटीचा खेळ चालला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप, शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून पैशाचा खेळ कसा चालला आहे याचा स्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.
दरम्यान जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आज रामदास कदम यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापू पाहत आहे, असा आरोप करत प्रसाद लाड यांचे काही फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. त्यानंतर भाजपने मोठी आक्रमक भूमिका घेत आता रामदास कदमांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. दुपारी प्रवीण दरेकरांनी सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मनोज जरांगेंचं उपोषण सोडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रसाद लाड यांनी रामदास कदमांना आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.
रामदास कदमांना फालतू काम बंद करावं. आम्ही महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मागे खंबीरपणे उभा होतो. महायुतीचं कर्तव्य काय आहे, हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही ज्येष्ठ आहात, म्हणून शिंदे साहेब तुमचा आदर करतात. पण मागून तुम्ही याच शिंदे साहेबांबद्दल आणि त्यांच्या मुलाबद्दल काय बोलता याच्या क्लिपजर आम्ही उघड केल्या तर तुम्हाला तुमची जागा निश्चितपणे कळेलं, हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना या ऑडिओ क्लिपची माहिती दिली. मु्ख्यमंत्र्यांनी भूमिका घेत सायबर क्राइमला या क्लिपची चौकशी करण्यासाठी आदेश दिले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर आरोप केले. प्रसाद लाड जरांगे पाटलांना भेटले वगैरै. भाजप एकनाथ शिंदेंचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याबरोबर जेवले, असे अनेक आरोप त्यांनी केले. मी त्या आरोपांचं खंडन करतो.
शिंदे साहेबांना एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही प्रामाणिकपणे एका मध्यस्थाची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी आंदोलन मागे घ्यावं यासाठी प्रयत्न केला. अनेक नेते यामध्ये होते, विखे पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, उदय सामंत, मकरंद आबा यांनी हे प्रयत्न केले, पण जर रामदास कदम भाजपला बदनाम करणार असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असं यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी