नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ६०.६९ टक्के मतदान
मतदानात वर्धा जिल्हा आघाडीवर भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी मतदान नागपूर, २३ ऑक्टोबर (हिं.स.) । नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले. विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६०.६९ टक्के मतदाना
मतदान लोगो


मतदानात वर्धा जिल्हा आघाडीवर भंडारा जिल्ह्यात सर्वांत कमी मतदान

नागपूर, २३ ऑक्टोबर (हिं.स.) । नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले. विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६०.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. विभागत वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ६८.८६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर सर्वात कमी ५२.३५ टक्के मतदान भंडारा जिल्ह्यात नोंदवल्या गेले. विभागात एकूण १ लाख ५५ हजार १३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही आकडेवारी तात्पुरती असून अंतिम आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नागपूर विभागाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रवीण कुमावंशी यांनी जाहीर केलेल्या मतदानाच्या तात्पुरत्या टक्केवारीनुसार नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांत एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार नोंदणीकृत होते. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश होता. दुपारी ४ वाजेपर्यंत ९४ हजार ४५७ पुरुष आणि ६० हजार ६७६ महिलांनी मतदान केले. एकूण मतदानाची टक्केवारी ६०.६९ इतकी राहिली. पुरुष मतदारांचा मतदानातील सहभाग ६४.१३ टक्के, तर महिला मतदारांचा सहभाग ५६.०३ टक्के नोंदविण्यात आला.

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक मतदान

जिल्हानिहाय आकडेवारीत वर्धा जिल्ह्याने ६८.८६ टक्के मतदानासह प्रथम क्रमांक मिळविला. येथे २१ हजार ७४२ मतदारांपैकी १४ हजार ९७२ मतदारांनी मतदान केले. त्यापाठोपाठ गडचिरोली जिल्ह्यात ६८.७८ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या जिल्ह्यात १३ हजार ६०८ मतदारांपैकी ९ हजार ३६० मतदारांनी मतदान केले.

गोंदिया जिल्ह्यात ६२.५७ टक्के, नागपूर जिल्ह्यात ६०.२० टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यात ५८.२० टक्के मतदान झाले. भंडारा जिल्ह्यात मात्र मतदानाची टक्केवारी ५२.३५ इतकी राहिली. त्यामुळे हा जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत शेवटच्या क्रमांकावर राहिला.

जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी

नागपूर :- एकूण १ लाख ४४ हजार ४६६ मतदारांपैकी ८६ हजार ९७४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६०.२० राहिली.

भंडारा :- एकूण २१ हजार ३४९ मतदारांपैकी ११ हजार १७६ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५२.३५ राहिली.

गोंदिया :- एकूण २२ हजार १७६ मतदारांपैकी १३ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६२.५७ राहिली.

वर्धा :- एकूण २१ हजार ७४२ मतदारांपैकी १४ हजार ९७२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६८.८६ राहिली.

चंद्रपूर :- एकूण ३२ हजार २६२ मतदारांपैकी १८ हजार ७७५ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५८.२० राहिली.

गडचिरोली :- एकूण १३ हजार ६०८ मतदारांपैकी ९ हजार ३६० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६८.७८ राहिली.

पुरुष मतदारांचा सहभाग अधिक

एकूण मतदानाच्या आकडेवारीत पुरुष मतदारांचा सहभाग महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले. विभागात पुरुषांचे मतदान ६४.१३ टक्के, तर महिलांचे मतदान ५६.०३ टक्के नोंदविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात पुरुष मतदारांचा सहभाग ७०.८२ टक्के इतका राहिला.दरम्यान, निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी तात्पुरती असून अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर झाल्यानंतर त्यात काही बदल होऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande