लातूरमध्ये वाळू उपसा, मटका आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी
लातूर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. मटका बुकी, जुगार अड्डा आणि अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध केलेल्या तीन स्वतंत्र कारव
पोलीस कारवाई


लातूर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. मटका बुकी, जुगार अड्डा आणि अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १८ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, तब्बल ६२ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोकलेन यंत्र, दोन ट्रॅक्टर, १९ मोबाईल आणि रोख रकमेचा समावेश आहे.

मटका बुकीवर कारवाई; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

लातूरमधील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिगंबर चौक परिसरात दगडूशेठ यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर विशेष पथकाने २२ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या ठिकाणाहून ९ हजार ८९० रुपये रोख आणि ११ मोबाईल असा एकूण ६६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात नऊ जणांविरुद्ध कारवाई करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; सहा जणांवर कारवाई

दुसऱ्या कारवाईत मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर येथील अप्पा मस्के यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १८ हजार ३० रुपये रोख, आठ मोबाईल आणि चार मोटारसायकली असा एकूण २ लाख ८० हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध मुरूड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिरू नदीपात्रात अवैध वाळू उपसा; ५९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विशेष पथकाने मौजे सुल्लाळी शिवारातील वाळू धक्क्यावर रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी कारवाई केली. यावेळी तिरू नदीच्या पात्रातून पोकलेन यंत्राच्या साहाय्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करून तिची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत एक पोकलेन यंत्र, दोन ट्रॅक्टर आणि नदीपात्रातून काढून ठेवलेली वाळू असा एकूण ५९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध कारवाई करून जळकोट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम ४८ (७) व ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन कारवायांत ६२.५१ लाखांचा मुद्देमाल

या तीनही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १८ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून २७ हजार ९२० रुपये रोख, १९ मोबाईल, एक पोकलेन यंत्र आणि दोन ट्रॅक्टर असा एकूण ६२ लाख ५१ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande