पहूर : बैलजोडी चोरीचा उलगडा; २.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, २३ ऑक्टोबर (हिं.स.) : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेल्या बैलजोडीच्या प्रकरणाचा पहूर पोलिसांनी उलगडा केला आहे. चोरीची बैलजोडी सुनसगाव येथून हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणात सोनाळा येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्
पहूर : बैलजोडी चोरीचा उलगडा; २.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, २३ ऑक्टोबर (हिं.स.) : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेल्या बैलजोडीच्या प्रकरणाचा पहूर पोलिसांनी उलगडा केला आहे. चोरीची बैलजोडी सुनसगाव येथून हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणात सोनाळा येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चोरीची बैलजोडी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बैलजोडी आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपळगाव गोलाईत येथील गट क्रमांक १०७ मधील शेतातून ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मावळी जातीची पांढरी बैलजोडी चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या मदतीने बैलजोडी चोरून नेली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासासाठी पथके रवाना केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघे रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्यांनी दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची माहिती दिली. चोरीची बैलजोडी सुनसगाव येथील व्यापाऱ्याला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

तपासादरम्यान पोलिसांनी सुनसगाव येथे जाऊन पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्या शेतातून चोरीची बैलजोडी हस्तगत केली. बैलजोडीची किंमत १ लाख ५ हजार रुपये, तर गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, हवालदार दीपक पाटील, पोलीस कर्मचारी ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि वाहनचालक हेमंत सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार दीपक पाटील करीत आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande