शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी दोघांना अटक
Two arrested in Shalarth ID scam case,
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी दोघांना अटक


नाशिक, २३ ऑक्टोबर (हिं.स.) : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अमोल रमेश कुलकर्णी आणि शशिकांत भाऊराव हिंगोणीकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना शुक्रवारी (दि. २३) अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिकरोड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक केली.दुसरा आरोपी शशिकांत भाऊराव हिंगोणीकर याला न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या ट्रान्सफर वॉरंटच्या आधारे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तपासी अधिकारी आणि सरकारी अभियोक्ता यांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. गुन्ह्यातील बनावट कागदपत्रे आणि फसवणुकीशी संबंधित रक्कम हस्तगत करणे, अन्य आरोपींचा शोध घेणे तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळविणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.तपासाची आवश्यकता विचारात घेऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रांचा तपास सुरू

शालार्थ आयडी प्रकरणात आर्थिक व्यवहारांची तपासणी, बनावट कागदपत्रांची निर्मिती व त्यांचा वापर तसेच या प्रकरणात इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासह घोटाळ्याशी संबंधित पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्यावर तपास यंत्रणेचा भर आहे. पुढील तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande