मानवी संसाधन यंत्रणा मजबूत करण्यासाठी गोदरेज फाऊंडेशन आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार
मुंबई, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)- गोदरेज फाऊंडेशन या स्वतंत्र धर्मादाय ट्रस्टने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग आणि समग्र डेव्हलपमेंट फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. या दोन वर्षांच्या भागीदारीच्या कालावधीत राज्य सरकारमधील मानवी संसाधन सुधारणा
मानवी संसाधन यंत्रणा मजबूत करण्यासाठी गोदरेज फाऊंडेशन आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करा


मुंबई, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)- गोदरेज फाऊंडेशन या स्वतंत्र धर्मादाय ट्रस्टने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग आणि समग्र डेव्हलपमेंट फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. या दोन वर्षांच्या भागीदारीच्या कालावधीत राज्य सरकारमधील मानवी संसाधन सुधारणांना बळ दिले जाईल. सर्वसमावेशक प्रशासकीय कामकाज आणि कर्मचारी व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कर्मचा-यांची भरती, नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याकरिता या कार्यक्रम राबवण्यात येईल. विविध विभागांतील कार्यक्षमता सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या प्रक्रियेद्वारे सरकारी कामकाजात अचूक माहिती व डेटाच्या आधारे जलद निर्णय घेणे सोपे होईल.

या भागीदारीअंतर्गत, राज्य सरकार अपेक्षित सुधारणा घडवून आणण्यासाठी धोरणात्मक दिशा ठरवेल तसेच संस्थात्मक नेतृत्व प्रदान करेल. या उपक्रमात गोदरेज फाऊंडेशन हे सहकार्य तसेच धोरणात्मक सहकार्य करणा-या भागीदाराची जबाबदारी पार पाडेल. सार्वजनिक सुधारणांसाठी काम करणारी समग्र ही ना नफा-विरहित संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणीची धुरा सांभाळेल. दैनंदिन कामकाज, प्रक्रियेतील सुधारणा, तंत्रज्ञानाचा सुलभ वापर आणि ज्ञान निर्मितीचेही काम पाहेल.

या करारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. करारातून साध्य केल्या जाणा-या उपक्रमांविषयी माहिती देताना त्यांनी शासन व्यवस्थेत अपेक्षित असलेल्या सुधारणा घडवून आणण्याविषयी सांगितले. “या उपक्रमाकरिता गोदरेज फाऊंडेशन आणि समग्रसोबत भागीदारी करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवा वितरण सुधारणा-या प्रशासकीय सुधारणांसाठी शासन कटिबद्ध आहे. हे सहकार्य तंत्रज्ञानावर आधारित मजबूत एच-आर यंत्रणा उभारण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे मनुष्यबळाचे योग्य नियोजन, अचूक निर्णयप्रक्रिया आणि कामकाजाची प्रक्रियाही सोपी होईल. संस्थात्मक क्षमता मजबूत करून महाराष्ट्रातील जनतेसाठी कार्यक्षम आणि प्रतिसादात्मक शासन व्यवस्था निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.”असे श्री. फडणवीस म्हणाले.

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले,”सरकार, उद्योग क्षेत्र आणि नागरी समाज एकाच उद्देशाने एकत्र आल्यानंतर अर्थपूर्ण बदल घडून येतो. आमची राज्य सरकारसोबतची ही भागीदारी राज्यातील महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांवर एकत्रितपणे काम करण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे. संधी निर्माण करणा-या, जीवनमान सुधारणा-या आणि युवा पिढीसाठी सक्षम तसेच समृद्ध महाराष्ट्र घडवणा-या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी गोदरेज संस्था सदैव कटिबद्ध आहे.”

या भागीदारीच्यामार्फत प्रशासकीय सुधारणा घडवली जाईल. एचआर व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. मनुष्यबळाचे विश्लेषण आणि रिपोर्टिंग सुधारण्यावर काम केले जाईल. कर्मचा-यांची कार्यक्षमता आणि क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कामकाजासंदर्भातील अनुभवांची नोंद ठेवली जाईल, जेणेकरून देशभरात या पद्धतीच्या सुधारणा घडवणे सोपे होईल.

गोदरेज फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमर मोमीन म्हणाले, ‘‘नागरिकांपर्यंत योग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सशक्त सरकारी संस्थांची उभारणी करावी लागते. या कराराच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या प्रयत्नांना संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आधुनिक, कार्यक्षम आणि डेटा-आधारित एचआर यंत्रणा उभारणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज मजबूत होईल. सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारेल.”

हा उपक्रम राज्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी राबवण्यात येत आहे. संस्थात्मक सहकार्य आणि प्रशासकीय सुधारणांच्या माध्यमातून सशक्त शासन व्यवस्थेची उभारणी करण्याचा सर्वसामायिक उद्देश यातून साध्य केला जाईल. परिणामी, सरकारी यंत्रणा सशक्त होत प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडून येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande