
सोलापूर, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पुढील नऊ महिने पुरेसा पाणीपुरवठा होईल, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी काटेकोर नियोजन करावे. दुष्काळी उपाययोजनांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी उपाययोजनांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय पाणी नियोजन, भूजल पुनर्भरण, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पुढील आठवड्यात गावनिहाय पाणी नियोजनाचा समावेश असलेला कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. फीडिंग पॉईंटच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भूजल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाफ्ट उभारण्याकरिता आवश्यक निधीची मागणी करावी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. पालकमंत्र्यांची मान्यता घेऊन प्राधान्यक्रमानुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड