रत्नागिरी : अवघ्या ३ दिवसांत जिल्ह्यात ३ तरुणींची आत्महत्या
रत्नागिरी, 24 ऑक्टोबर (हिं.स.) । जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खेड, चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान आत्महत्येच्या घटना घडल्या. पहिली घटना
रत्नागिरी : अवघ्या ३ दिवसांत जिल्ह्यात ३ तरुणींची आत्महत्या


रत्नागिरी, 24 ऑक्टोबर (हिं.स.) । जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत ऐन विशीतील तीन तरुणींनी गळफास घेऊन आत्महत्या केली. खेड, चिपळूण आणि गुहागर या तीन तालुक्यांत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान आत्महत्येच्या घटना घडल्या.

पहिली घटना खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे १७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मूळची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील रहिवासी दिव्या दत्तात्रय काळे (वय २१) ही तरुणी घाणेखुंट येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. तिने सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या खोलीतील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास लावून घेतला. तिला तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. ही घटना ताजी असतानाच, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील रावळगाव-सुर्वेवाडी येथे अमिषा अरविंद सुर्वे (वय २३) या तरुणीने राहत्या घराच्या पडवीत अज्ञात कारणावरून गळफास घेतला. कुटुंबीयांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी धाव घेतली, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तिसरी घटना त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे घडली. मूळची कराड येथील रहिवासी आणि वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थिनी अंजली अमोल पाटील (वय अंदाजे २०) हिने ओझरवाडी येथील भाड्याच्या खोलीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या तिन्ही तरुणींनी टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण स्पष्ट झालेले नसून संबंधित पोलीस ठाण्यांकडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी झगडणाऱ्या तरुणाईच्या अशा टोकाच्या पावलांमुळे संपूर्ण कोकणात तीव्र चिंता आणि शोक व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande