
जळगाव, 24 ऑक्टोबर (हिं.स.) शेतातून बैलजोडी चोरीला गेल्याच्या घटनेचा पहूर पोलिसांनी यशस्वी तपास करत उलगडा केला आहे. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीस गेलेली बैलजोडी पोलिसांनी सुनसगाव येथून हस्तगत केली. या प्रकरणात सोनाळा येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीची बैलजोडी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला टेम्पो आणि बैलजोडी असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपळगाव गोलाईत येथील गट क्रमांक १०७ मधील शेतातून ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास मावळी जातीची पांढरी बैलजोडी चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या मदतीने बैलजोडी चोरून नेली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासासाठी पथके रवाना केली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघे रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीची बैलजोडी सुनसगाव येथील एका व्यापाऱ्याला विकल्याचेही तपासात उघड झाले. तपासाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सुनसगाव येथे जाऊन पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्या शेतातून चोरीची बैलजोडी हस्तगत केली. जप्त केलेल्या बैलजोडीची किंमत १ लाख ५ हजार रुपये, तर गुन्ह्यात वापरलेल्या टेम्पोची किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार दीपक पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर