
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच आसाम, मिझोराम आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त यशस्वी कारवाईचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय सीमांचा फायदा घेऊन भारताच्या युवा पिढीला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही टोळीला सोडले जाणार नाही, असा कडक संदेश त्यांनी दिला.
अमित शाह यांनी ‘एक्स’वर लिहिले की, “केंद्रातील मोदी सरकारने अमली पदार्थ आणि बेकायदेशीर नेटवर्कविरोधातील आपल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत ‘ऑपरेशन ट्रायडंट’ राबवून आंतरराष्ट्रीय नार्को-कार्टेलला मोठा धक्का दिला आहे. २३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत आसाम, मिझोराम आणि मणिपूरमधील ३८ वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी जोरदार छापेमारी करण्यात आली. या कारवाईत तस्कर टोळीचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
‘ऑपरेशन ट्रायडंट’दरम्यान तपास यंत्रणांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागले आहेत. सुमारे १०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांची माहिती समोर आली आहे. या नेटवर्कशी संबंधित १,४२४ बँक खाती तातडीने गोठवण्यात आली आहेत, तर १७.८२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान ५०० डेटोनेटर्स आणि १२ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या १८ प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे.”
तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय नार्को-सिंडिकेट ‘डेथ ट्रँगल कॉरिडॉर’चा वापर करून भारत, म्यानमार आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमांमार्गे अमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी करत होते. ही समन्वित कारवाई ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत देशातील अमली पदार्थांच्या संपूर्ण नेटवर्कचे मुळापासून उच्चाटन करण्याच्या भारत सरकारच्या दृढ संकल्पाचा एक भाग आहे. नार्को-कार्टेलचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule