
* ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वेगाने साकार होईल!
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : आजपासून १२ वर्षांपूर्वी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा प्रवास सातत्याने सुरू आहे. या प्रवासाचे सहप्रवासीही तुम्हीच आहात आणि मार्गदर्शकही तुम्हीच आहात. माझ्यासाठी ‘मन की बात’ हा देशातल्या सामान्य माणसाच्या परिश्रमांचा, पराक्रमाचा, त्याच्या प्रतिबद्धतेचा, समर्पणाचा आणि सेवाभावाचा गौरव करण्याची एक चांगली संधी म्हणून समोर आला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. 'मन की बात'च्या 139 व्या भागातून त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
सणांच्या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांसाठी अनेक वस्तू खरेदी करतो. यंदाही खरेदी करताना स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्या. तुमच्या खरेदीमुळे त्यांचा उत्साह वाढेल. तुमच्या या आपुलकीमुळे ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाला आणखी बळ मिळेल. हे अभियान जितक्या वेगाने पुढे जाईल, तितक्याच वेगाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्नही साकार होईल. स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना अधिक प्राधान्य आणि महत्त्व द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आपल्या देशात शतकानुंशतके तीर्थयात्रेची परंपरा चालत आली आहे. माझ्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रम देखील देशातल्या लोकांचे प्रयत्न जवळून जाणून घेण्याचा आणि त्यांच्या योगदानाला वंदन करण्याचा तीर्थयात्रेइतकाच पवित्र अनुभव आहे. जे लोक समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जगतात, ते स्वतःमध्येच एका तीर्थस्थळासारखे असतात. गेल्या १२ वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक लोक समोर आले आहेत, ज्यांच्या असाधारण कार्यांकडे सामान्यतः समाजाचे कधी लक्ष जात नाही.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एकप्रकारे देशातल्या लोकशक्तीची आराधना करतो. या कार्यक्रमामुळे मला देशातल्या प्रत्येक कुटुंबाशी जोडले जाण्याची संधी मिळते. मला शंभरपेक्षा जास्त असे संदेश आलेत, ज्यामध्ये लोक सांगतात की, ‘मन की बात’ ऐकल्यानंतर त्यांना असे वाटतं की, जणू मी त्यांच्यामध्ये, त्यांच्या कुटुंबात बसून, कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे त्या सर्वांशी संवाद साधत आहे. माझ्याकरिता तुम्हा सर्व श्रोत्यांची ही आत्मीयता आणि तुमचे हे प्रेम हीच अत्यंत अमूल्य अशी पुंजी आहे.
आपल्या देशात असे अनेक पारंपरिक कौशल्य प्रकार आहेत, जे पिढ्यान्पिढ्या आपल्या ओळखीचा एक भाग बनले आहेत. आनंदाची बाब म्हणजे, आता या परंपरांशी जोडले जाऊन अनेक नवनवीन प्रयोगही केले जात आहेत आणि या परंपरांना आजच्या काळानुरूप पुढे नेलं जात आहे.
आपल्या देशात निसर्गाप्रती आदर बाळगण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवले आहे की, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणं आणि जलस्रोतांची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. देशातल्या अनेक लोकांनी ही भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली आहे, हे पाहून मला आनंद होतो.
जेव्हा समाज अशा भावनेने एकजुटीने काम करतो, तेव्हा परिवर्तनाची हमी निश्चित होते. याची एक झलक आपल्याला आपल्या सण-उत्सवांमध्येही पाहायला मिळते. अवघ्या काही दिवसांत दिवाळी आणि छठ या पवित्र सणांचे आगमन होणार आहे. या सणांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आपण जिथे राहतो, त्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपले छोटे-छोटे प्रयत्नही आपल्या सभोवतालच्या परिसरात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात. सणासुदीच्या या काळात तुम्हा सर्वांनी आपल्या आजूबाजूला एक बदल नक्कीच अनुभवला असेल. आता लोक खरेदी करताना स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ ही भावना आता आपल्या उत्पादनांना जगभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवत आहे.
महाराष्ट्रातल्या आदिवासी समुदायांनी स्वतः तयार केलेल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येथे ‘शबरी नेचुरल्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून मध, मोहफुले, चारोळी आणि बांबूपासून तयार केलेली उत्पादने बाजारात आणली जात आहेत. त्यांच्या पॅकेजिंगवर आदिवासी कलेची सुंदर छाप दिसून येते. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन पुरस्कार’ मिळाला आहे.
आपले तरुणही या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. कर्नाटकातील ‘बॅम्बू’ (Bamboo) हे स्टार्टअप बांबू आणि शेतीतून निर्माण होणाऱ्या अवशेषांपासून पॅकेजिंगसाठी आवश्यक साहित्य तयार करत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी