
चंद्रपूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मधून मिळालेली प्रेरणा माझ्यासाठी केवळ विचारांपुरती मर्यादित राहिली नाही, तर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी भरीव करण्याची ऊर्जा ठरली. आपण केलेल्या प्रयत्नातून समाजात मोठा बदल घडू शकतो, हा विश्वास ‘मन की बात’ने दिला. याच प्रेरणेतून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, बांबू संशोधन आणि रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत चंद्रपूरच्या प्रगतीसाठी काम करता आले, ही माझ्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
‘मन की बात’च्या १२ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासानिमित्त प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘मन की बात’च्या १३८ भागांचा QR कोड समाविष्ट असलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्यातून प्रेरणा घेत, त्या प्रेरणेचे समाजहिताच्या कृतीत रूपांतर करून विकसित भारताच्या निर्मितीत आपले योगदान देणे, हाच या उपक्रमाचा खरा संदेश असल्याची भावना आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, महापौर संगीता खांडेकर, सपनाताई मुनगंटीवार, जिल्हा संघचालक तुषारजी देवपुजारी, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, वासुदेव गाडेगोणे, गीताअनुवादक फातिमा बहन, पांडुरंग आंबटकर, किसनलाल चड्डा यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, गायत्री परिवाराचे सदस्य, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारा आणि विचारांना कृतीची जोड देणारा प्रेरणास्रोत आहे. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी सुरू झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, शेती, सामाजिक परिवर्तन आणि सामान्य माणसाच्या असामान्य कार्याची देशाला ओळख झाली. सामान्य व्यक्तीने आपल्या कर्तृत्वातून समाजासमोर आदर्श निर्माण केला, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते. हीच ‘मन की बात’ची खरी ताकद आहे.या विचारांमधून प्रेरणा घेत जिल्ह्यात सैनिकी शाळा,वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन,अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण, स्मार्ट अभ्यासिका, वाचनालये, अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल, जलसंधारण, कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक रोजगार प्रकल्प यांसह विविध विकासकामांना चालना देता आली. विकास म्हणजे केवळ इमारती उभारणे नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, संशोधन आणि सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन समृद्ध करणे होय, असे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
‘मन की बात’च्या १३८ भागांतील विचारांचा समावेश असलेल्या QR कोडयुक्त पुस्तकाचे यावेळी विमोचन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना प्रेरणादायी विचारांशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या भागांचे नियमित श्रवण करावे, त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावेत आणि आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. विचारांचे संकलन, त्यांचे आकलन आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोग यांमधूनच व्यक्तिमत्त्व घडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव