
नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।
: अंबड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अंबड-दत्तनगर परिसरातील बोअरवेलच्या पाण्यात विषारी क्रोमियम आढळल्याच्या प्रकरणाने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पिवळ्या रंगाचे दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याच्या तक्रारी असतानाही प्रशासनाला जाग येण्यासाठी एवढा गदारोळ का व्हावा लागला, असा संतप्त सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नावर सोमवारपासून (दि. २६) संबंधित कंपनीसमोर ते बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींसाठी १९७३ मध्ये सुमारे ११०० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या आजही कायम असल्याचा आरोप दातीर यांनी केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यामुळे उर्वरित शेतजमिनींचे नुकसान होत असून, विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी प्रयोगशाळेच्या तपासणीत पाण्यात क्रोमियम व हेक्साव्हॅलेंट क्रोमियम आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रदूषित पाण्याची चर्चा वाढल्यानंतर प्रशासनाने संबंधित बोअरवेल बंद करण्याची तत्परता दाखवली. मात्र, इतके दिवस अधिकारी नेमके काय करत होते? नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना संबंधित यंत्रणा मूक गिळून गप्प का होती? असा सवाल दातीर यांनी उपस्थित केला आहे. केवळ बोअरवेल बंद करून प्रदूषणाचा प्रश्न सुटणार नसून, विषारी घटकांचा स्रोत शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. रासायनिक सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या दोषी भूखंडधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. गैरप्रकारांना पाठीशी घालणाऱ्या एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी दातीर यांनी केली आहे. औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक भूखंडाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून जमीनवाटप, प्रत्यक्ष वापर आणि आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशीही त्यांची मागणी आहे. दूषित पाण्याचे स्वतंत्र प्रयोगशाळेत परीक्षण, नागरिकांची आरोग्य तपासणी, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार दातीर यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने आता केवळ नोटिसांपुरते न थांबता ठोस कारवाई करावी, अशी मागणीहि दातीर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI