
१९ वर्षांखालील सर्व मुलांचा समावेश, दोन टप्प्यात राबविणार मोहीम
अमरावती, 25 ऑक्टोबर, (हिं.स.)। शासनाकडुन राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जंतनाशक दिन मोहीमेच्या अनुषंगाने टास्क फोर्स कमिटीची सभा आयोजित करण्यात आली होती.
अमरावती शहरामध्ये राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशकाची गोळी देण्यात येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालय व शाळाबाह्य १ ते १९ वर्षांच्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाच्या आठवड्यामध्ये जंतनाशकाची गोळी द्यावी, असे आवाहन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी केले आहे.
१ ते १९ वर्षातील किमान २८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असते. कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण आहेच. तसेच बालकांची शारिरीक व बौध्दिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. ही बाब लक्षात घेवून १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व शालेय वयोगटातील विद्यार्थी (शाळेतील व शाळाबाह्य) यांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आरोग्य, शिक्षण, एकात्मिक बाल विकास विभाग या तीन मुख्य विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संस्था स्तरावर शाळा महाविद्यालय मधील १ ते १९ वर्षाच्या मुलांना शिक्षकांमार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिन रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. तर समुदाय स्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घरोघरी जावून शाळेत न जाणाऱ्या १ ते १९ वर्षाच्या मुलांना दि.२७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत शहरातील मुलांना सदरचे औषध देण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंगणवाडी वयोगट (१ ते ६ वर्षे), शाळेतील (६ ते १८ वर्षे) व शाळाबाह्य मुलांचा समावेश आहे.
महानगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी, शाळा, शाळाबाह्य बालकांची नोंद असलेल्या १ लाख ७९ हजार ७१६ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या मोहिमेत Albendazole 400 mg ही गोळी चावून खाण्यास देण्यात येईल. त्यातही एक ते दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी गोळी (२०० मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या बालकास एक गोळी ( ४०० मि. ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून देण्यात येईल. गोळी घेतांना बालकाने नाश्ता अथवा जेवण केलेले असणे आवश्यक आहे. लाभार्थी संख्येनुसार आवश्यक गोळ्यांचा साठा सर्व केंद्रस्तरावर पोहोचविण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण झाले असून शिक्षकांनाही याबाबत सचेत करण्यात आले आहे,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
२७ ऑक्टोबर ला सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी द्यावी व १००% काम करणे. तसेच राहिलेल्या मुलांना ३ नोव्हेंबर २०२६ ला जंतनाशक गोळी देवून सदर मोहीम राबविण्यात यावे असे मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी निर्देश दिले. या सभेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, शिक्षणाधिकारी, बालरोगतज्ञ स्त्रीरोगतज्ञ् शहरी आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी