रस्त्यावर फटाकेबंदीच्या न्यायालयाच्या निर्णयाची ठाण्यात अंमलबजावणी करावी - परिषा सरनाईक
ठाणे, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्याच्या निर्णयाची ठाणे शहरात कडक अंमलबजावणी करावी. तसेच शहरातील रस्त्यालगत दिवाळीच्या काळात उभारण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या स्टॉलला बंदी घालावी, अशी आग्रही मागणी शिवस
ठाणे


ठाणे, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्याच्या निर्णयाची ठाणे शहरात कडक अंमलबजावणी करावी. तसेच शहरातील रस्त्यालगत दिवाळीच्या काळात उभारण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या स्टॉलला बंदी घालावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाकेबंदीची उपाययोजना आवश्यक असल्याचे नगरसेविका परिषा सरनाईक यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांच्या काळात दिवाळीच्या काळात वायू व ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यात यंदा `एल निनो'च्या प्रभावामुळे वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. दिवाळीच्या काळात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांबरोबर पशू-पक्ष्यांनाही त्रास होत आहे. सततच्या आवाजामुळे तणावामध्ये वाढ होत असल्याचेही सिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेविका परिषा सरनाईक यांनी दिली. तसेच दिवाळीच्या काळात सार्वजनिक रस्ते व सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याबरोबर समन्वय साधून धोरण ठरवावे, अशी मागणी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

दिवाळीच्या १५ दिवसांपूर्वी व दिवाळीच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांलगत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची अधिकृत व बेकायदा दुकाने थाटली जातात. या ठिकाणी अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजनाही केलेली नसते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उच्च न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगतच्या फटाक्यांच्या दुकानांबाबतही सतर्कता घेण्याची आवश्यकता आहे. रस्त्यालगतच्या दुकानांपासून असलेला धोका लक्षात घेऊन, रस्त्यालगतच्या अधिकृत व बेकायदेशीर फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी परिषा सरनाईक यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी वर्तकनगर व चितळसर-मानपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनाही पत्र पाठवून फटाके फोडण्यास बंदीच्या मागणीची कडक अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. उपवन तलाव परिसर, गावंड बाग, पायलादेवी मंदिर रस्ता, क्रांतीवीर बिरसा मुंडा मार्ग ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर रहिवाशी सोसायट्या आहेत. या ठिकाणी फटाकेबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी स्थानिक नगरसेवक व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही नगरसेविका परिषा सरनाईक यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande