
अमरावती, 25 ऑक्टोबर (हिं.स.) | महाराष्ट्र विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती विभाग मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदानानंतर आता मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवार २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. यासाठी एकूण १५२ अधिकारी/ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून २३ अधिकारी/ कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याप्रमाणे एकूण १७५ अधिकारी - कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवनात सुसज्ज असे मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून, याच ठिकाणी मतमोजणी कक्ष आणि स्ट्रॉग रूम राहणार आहेत. मतमोजणीसाठीचे सविस्तर प्रशिक्षण मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिले प्रशिक्षण बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृह क्र. १ येथे देण्यात आले आहे. दुसरे प्रशिक्षण प्रत्यक्ष मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी देण्यात येत आहे. तसेच राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या मतमोजणी केंद्रातील नियुक्त प्रतिनिधींना मतमोजणी प्रक्रीयेविषयीची सविस्तर माहिती सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित प्रशिक्षण सत्रात देण्यात येत आहे.
मतमोजणीसाठी १४ टेबलांच्या व एका टपाली मतपत्रिकांसाठीच्या टेबलाच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाकडून मंजूरी मिळाली आहे. प्रत्येक ३ टेबलवरील मतमोजणी कार्यावर प्रत्येकी १ जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे. अशा पध्दतीने विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर चार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात येत आहेत. त्यानुसार १४ टेबलांवर एकूण ५६ अधिकारी-कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलची जबाबदारी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येणार असून, त्यांच्या अधिपत्याखाली तहसीलदार आणि नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी- कर्मचारी काम पाहणार आहेत. याशिवाय आवश्यक नियुक्त अधिकारी -कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. एक टेबल टपाली मतपत्रिका गणना करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे निवडणूक आयोगाकडून १४ सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
याबरोबरच १ अधिकारी, ५ सहायक अधिकारी हे संपूर्ण मतमोजणीवर नियंत्रण व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी, २ अधिकारी हे रो-ऑफिसर म्हणून मतमोजणीचे सर्व अहवाल पर्यवेक्षक यांच्याकडून घेवून निवडणूक निर्णय अधिकारी व टॅब्युलेशन टिमकडे देण्यासाठी, १ अधिकारी, ९ सहायक अधिकारी/कर्मचारी हे संपूर्ण मतमोजणीचे कार्यान्वयन व समन्वयन करण्यासाठी, १ अधिकारी, ५ सहायक अधिकारी/ कर्मचारी पिजन होल व एलिमिनेशन प्रक्रिया पार पाडण्यासाठी, १ अधिकारी, ३ सहायक अधिकारी/ कर्मचारी टपाली मतपत्रिकांसाठी, १० अधिकारी, ४३ सहायक अधिकारी/ कर्मचारी प्राथमिक फेरीनंतर मतमोजणीच्या अनुषंगाने इतर कामकाजासाठी तर ११ अधिकारी/कर्मचारी राखीव मतगणना अधिकारी/कर्मचारी म्हणून नेमण्यात आले आहेत.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी विक्रमी मतदान झाले. ३३ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ही टक्केवारी ९२.२५ इतकी आहे. मतदानानंतर सर्व ८१ मतदान केंद्रावरील मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये रितसर जमा करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक दक्षता घेऊन प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. याकरीता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही काढण्यात आले आहेत. अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.
---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी