राहुल गांधींचा १ नोव्हेंबरला ‘चलो दिल्ली’चा नारा
‘आमची मते चोरली जात आहेत, सहन करणार नाही’ नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘आमची मते चोरली जात आहेत आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमि
Rahul Gandhi Chalo Delhi November 1


‘आमची मते चोरली जात आहेत, सहन करणार नाही’

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘आमची मते चोरली जात आहेत आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या सभेला विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप केला. लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून, त्यांच्या मतांचा आणि आवाजाचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मतांची कथित चोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सभेला १० लाखांहून अधिक लोक जमण्याचा दावा

हरियाणा काँग्रेसचे प्रभारी संजय दत्त आणि प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी रामलीला मैदानावरील सभेला १० लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा दावा केला आहे. या सभेच्या माध्यमातून विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा देशभरात उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या व्यापारी संघटनेने राहुल गांधी यांना इंडिया ब्लॉकची रॅली पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दिल्लीतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि व्यापार होत असतो. अशा वेळी रॅलीमुळे व्यापारी व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो आणि सुमारे १० हजार कोटी रुपयांचे व्यावसायिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

भाजपचे आभार मानत राहुल गांधींचा टोला

रामलीला मैदानावरील सभेचे आवाहन करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपरोधिक शब्दांत आभार मानले. हे लोक सभेचा उत्साहाने प्रचार करत असून, कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. भाजपकडून होणाऱ्या टीकेचाही सभेच्या प्रचारासाठी उपयोग होत असल्याचे त्यांनी सूचित केले.

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधक आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातही विरोधी पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. इंडिया ब्लॉकच्या नेत्यांनी ६ ते १३ ऑक्टोबरदरम्यान त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलने केल्याचे वृत्त आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही या मुद्द्यावर आवाज उठवला. १० ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र दिल्ली पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राजधानीत बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तसेच ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आणि सात हजारांहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे आगामी रामलीला मैदानावरील सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande