
* मायक्रो फायनान्स कंपन्या वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा जीव घेत आहेत - विजय वडेट्टीवार
नागपूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.) - भीमाशंकर परिसर टोरंट कंपनीच्या वीज प्रकल्पासाठी ६०० एकर जंगलतोड होणार आहे. गुजरातच्या उद्योजकांसाठी वृक्षांची कत्तल होत आहे, जंगल उद्ध्वस्त होत आहे याला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी कडाडून विरोध केला.
गुजरातमधील टोरंट कंपनीच्या प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्याची गरजच काय? पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी ओसाड जमिनीचा पर्याय का निवडला जात नाही,असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. आता मुख्यमंत्री ९० हजार झाडे लावण्याचे आश्वासन देतात, पण आज तोडल्या जाणाऱ्या जुन्या जंगलाची भरपाई त्यातील जैवविविधतेची ही नवीन झाडे लगेच करू शकतील का? या भीमाशंकर परिसरात शेकरूसारख्या वन्यजीवांचा अधिवास असून अनेक नद्यांची उगमस्थानेही या भागात आहेत. जंगलतोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि त्याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मायक्रोफायनान्स कंपनीकडून हत्या केल्याचा आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्याकडे सत्ताधाऱ्यांचा पैसा आहे. या कंपन्या गरजू शेतकऱ्यांना कॅश मध्ये पैसे देतात त्यावर १२ ते १४ टक्के व्याज आकारण्यात येत. वसुली एजंट हे गुंड असतात. नांदेड मधील शेतकरी शिंदे यांचा जीव या गुंडानी घेतला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी देखील हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या दबावानंतर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांचे एजंट शेतकऱ्यांचे जीव घेत आहेत. गावात या फायनान्स कंपन्यांचे एजंट दिसले गावाने एकत्र येऊन त्यांना झोडपून काढा अशी टीकाच वडेट्टीवार यांनी केली.
१ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘देश बचाव, वोट बचाव’ या अभियानांतर्गत देशभरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या आंदोलनासाठी प्रतिनिधी नियुक्त केले असून, राज्यभरात बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. विदर्भातूनही मोठ्या संख्येने नागरिक दिल्लीला जाणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मतदारांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे. दिल्लीतील व्यापाऱ्यांच्या नावाखाली आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या अधिकारांबाबत काँग्रेस आपली भूमिका पुराव्यांसह जनतेसमोर मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी जुन्या भिंतींना रंग देणे, दरवर्षी नवीन पडदे लावणे आणि इतर सजावटीच्या कामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचा वडेट्टीवार यांनी आरोप केला. कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत. काही कंत्राटदार आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशा परिस्थितीत अधिवेशनाच्या नावाखाली अनावश्यक खर्च कशासाठी असा सवाल त्यांनी केला. आहे त्या परिस्थितीत आवश्यक साफसफाई करून अधिवेशन घ्या. अनावश्यक खर्च करू नका. शेतकरी आत्महत्या करत असताना सरकारने त्यांच्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या पूर्वीच्या वक्तव्यांचाही विचार करावा, असे म्हटले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी ,सोनिया गांधी यांच्याबाबत भाजपच्या नेत्यांनी केलेली विधान भाजपच्या नेत्यांना आठवतात का? खरगे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी यापूर्वीच्या घटनांबाबत भाजपने घेतलेली भूमिका स्पष्ट करावी, असे टीका त्यांनी केली.
चामोर्शी आणि चिमूर परिसरातील वाघांच्या हल्ल्यांमुळे मानवी जीविताला निर्माण झालेल्या धोक्याबाबत वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. वाघांच्या हल्ल्यांत नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांकडे सरकार आणि वन विभागाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
मानवी जीविताचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. जंगलतोड होत असताना वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. वाघांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
मानवावर हल्ला करणाऱ्या वाघांचे योग्य व्यवस्थापन, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थलांतर आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. या प्रश्नावर वन विभागाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी