भीमाशंकर अभयारण्य परिसरातील टोरंट पॉवर प्रकल्पाला विरोध
बीड, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या सायडोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पामुळे सुमारे ६०० एकर क्षेत्रातील ३५ हजारांहून अधिक वृक्षांची तोड होण्याची शक्यता असल्याचा आ
म


बीड, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या सायडोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पामुळे सुमारे ६०० एकर क्षेत्रातील ३५ हजारांहून अधिक वृक्षांची तोड होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या दुर्मिळ शेकरूच्या नैसर्गिक अधिवासाला संभाव्य धोका लक्षात घेऊन हा प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रस्तावित प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांकडे शासनाचे लक्ष वेधत वनसंपत्ती आणि जैवविविधतेच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसर समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. या भागात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरू या विशाल खारीचा नैसर्गिक अधिवास आहे. प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास शेकरूसह अन्य वन्यजीवांच्या अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

पश्चिम घाट हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश असल्याने येथील जंगलसंपत्ती, वन्यजीव आणि जैवविविधतेचे संरक्षण करणे आवश्यक आहे. विकासकामांमुळे वनक्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता असल्यास संबंधित प्रकल्पांच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी

प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संभाव्य वृक्षतोड, वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे परिणाम आणि पर्यावरणीय परिणामांची निष्पक्ष चौकशी करावी. तसेच वनसंपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी प्रस्तावित प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले.

पर्यावरण संरक्षणासाठी घोषणाबाजी

आंदोलनादरम्यान ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’, ‘निसर्ग वाचवा, देश वाचवा’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल राखताना नैसर्गिक वनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी शासनाने घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सरफराज पठाण, रामनाथ खोड, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, नागेश मिठे पाटील, शिवशक्ती भीमशक्ती विचारमंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे, पक्षाचे शहराध्यक्ष सादेक सय्यद, शेतकरी हक्क मोर्चाचे आंदोलक राजेंद्र आमटे, सामाजिक कार्यकर्ते हनुमान घोडके, राष्ट्रीय किसान सभेचे मराठवाडा अध्यक्ष भिमराव कुटे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, अखिल भारतीय किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी. जी. तांदळे, प्राचार्य राजकुमार कदम, डीवायएफआयचे जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड सुहास जायभाये, कृष्णा राठोड आणि पर्यावरणप्रेमी अभिमान खरसाडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande