
बीड, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : माजलगाव–पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी वरील पात्रुड परिसरात रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून, रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी पात्रुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याची दुरवस्था दूर करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या महामार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) संबंधित कार्यालयाने १० नोव्हेंबर २०२६ पासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी कळविले आहे. त्यामुळे आता या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन निर्धारित तारखेपासून काम सुरू होण्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याची केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार आणि टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून भविष्यातही नागरिकांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होऊन रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू होणे आणि ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पात्रुड परिसरातील जनतेच्या न्याय्य मागणीसाठी हा लढा सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis