
सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स.)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘आवडेल तेथे पर्यटन’ या प्रवास योजनेचे पास आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पास काढण्यासाठी बसस्थानकात जाण्याची किंवा आरक्षण खिडकीसमोर रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, पर्यटनाचे नियोजन करणेही अधिक सोयीचे होणार आहे. महामंडळाने या योजनेअंतर्गत चार आणि सात दिवसांचे पास ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत.
प्रवाशांना महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आवश्यक माहिती भरून पास काढता येणार आहे. हा पास पीडीएफ स्वरूपात मोबाइलमध्ये जतन करण्याची सुविधा असून, गरजेनुसार त्याची छापील प्रतही काढता येईल. ऑनलाइन पासवर क्यूआर कोड उपलब्ध असेल. हा कोड स्कॅन करून पासची वैधता तपासता येणार आहे. त्यामुळे पासची पडताळणी करणे अधिक सोयीचे होईल. पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाणारे प्रवासी, धार्मिक यात्रेकरू तसेच सलग अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाइन पासमुळे कागदी पास हरविण्याची किंवा खराब होण्याची भीतीही कमी होणार आहे. चार आणि सात दिवसांच्या पासमुळे पर्यटन तसेच धार्मिक यात्रांसाठी एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नियोजन करणे सोपे होईल. ऑनलाइन सुविधेमुळे पास मिळविण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड