
गत वर्षी अवकाळी पावसाचा फटका; यंदा पावसाच्या खंडामुळे
यवतमाळ, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। वणी तालुक्यातील वनोजा परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून संत्रा उत्पादक शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे संत्र्याचा बहार फुटला आणि त्यानंतर फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाली. परिणामी, शेतकऱ्यांच्या संत्र्याच्या बागा फळांविना रिकाम्या राहिल्या. यंदा सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची आशा निर्माण झाली होती. मात्र, पावसाने पुन्हा खंड दिल्याने ही आशाही मावळली आहे. आता बागांना देण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर संत्र्याचा बहर तोडून टाकण्याची वेळ आली आहे.
यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने संत्र्याच्या झाडांना चांगला बहर आला. झाडांवर फळे लागल्याने यंदा तरी मागील वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने परिस्थिती पुन्हा बदलली. पावसाअभावी जलप्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नाही, तर भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीवरही याचा परिणाम जाणवत आहे. बाग फळावर असताना संत्र्याच्या बागांना पाणी देणे आवश्यक असते. मात्र, पाण्याचे स्रोत आटत चालल्याने बागांना पाणी द्यायचे कुठून, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. झाडांवर चांगल्या प्रमाणात फळे असली, तरी त्यांची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
पाण्याअभावी संत्र्याच्या फळांची वाढ खुंटत असून, झाडांवर मोठ्या प्रमाणात फळे कायम ठेवल्यास झाडांवर अतिरिक्त ताण येऊन संत्र्याच्या बागा वाळण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी झाडांवरील संत्र्याचा बहर तोडून टाकत आहेत. सध्या केवळ २५ ते ३० टक्के फळे झाडांवर ठेवली जात असून, उर्वरित फळे कमी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना नाईलाजाने घ्यावा लागत आहे. पावसाचा खंड असाच कायम राहिला आणि पाण्याची उपलब्धता वाढली नाही, तर झाडांवर ठेवलेली उर्वरित फळेही तोडून टाकण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यंदा चांगला बहर येऊनही अपेक्षित उत्पादन हातातून जाण्याची भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. संत्र्याची फळबाग उभी करणे आणि ती उत्पादनक्षम बनविणे हे मोठ्या मेहनतीचे आणि खर्चाचे काम आहे. लहान मुलाप्रमाणे बागेची काळजी घेत, खत, औषधे, मजुरी आणि सिंचनावर खर्च करून शेतकरी वर्षभर झाडे जगवतात. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर बागेला चांगला बहर आला असताना केवळ पाण्याअभावी फळे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
एका बाजूला बागेच्या संगोपनासाठी केलेला खर्च आणि दुसऱ्या बाजूला उत्पादनात घट होण्याची शक्यता, अशा दुहेरी संकटात संत्रा उत्पादक शेतकरी सापडले आहेत. त्यातच झाडांवर पाण्याचा ताण कायम राहिल्यास भविष्यातील उत्पादनावरही परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट मागील वर्षी अवकाळी पावसामुळे फळगळ होऊन नुकसान झाले, तर यंदा पावसाच्या खंडामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सलग दोन हंगामांतील या संकटांमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडण्याची शक्यता आहे. यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना आता फळे तोडून टाकावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारे उत्पन्न कमी होत आहे. झाडांवर लगडलेली फळे पाहून समाधान मिळण्याऐवजी तीच फळे पाण्याअभावी तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी