रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन; पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे उद्दिष्ट मंजूर
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन आगामी १० नोव्हेंबरपूर्वी बियाणे वितरणाचे नियोजन पुणे, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासह शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शास
रब्बी ज्वारी लागवडीला प्रोत्साहन; पुणे जिल्ह्यासाठी १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे उद्दिष्ट मंजूर


महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

आगामी १० नोव्हेंबरपूर्वी बियाणे वितरणाचे नियोजन

पुणे, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासह शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण उपअभियानांतर्गत रब्बी ज्वारी सन २०२६-२७ या योजनेसाठी पुणे जिल्ह्याला १५ हजार ८६० बियाणे मिनीकिट, म्हणजेच एकूण ६३४ क्विंटल ज्वारी बियाणांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या तसेच पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावर शासनाने भर दिला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे उपलब्ध होणार असून, प्रतिकूल हवामान परिस्थितीतही पीक उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

रब्बी ज्वारी हे अन्नधान्याबरोबरच पशुधनासाठी पौष्टिक चारा उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे पीक आहे. कमी पाण्यात या पिकाची लागवड शक्य असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान कमी करण्यास आणि शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

एका मिनीकिटमध्ये काय मिळणार ?

या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एका मिनीकिटमध्ये पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

४ किलो सुधारित ज्वारी बियाणे : परभणी सुपरमोती, फुले यशोमती आणि पीकेव्ही शक्ती या वाणांपैकी बियाणे.

जैविक खत : पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त जैविक खत.

लागवड मार्गदर्शन : ज्वारी पिकाची योग्य पद्धतीने लागवड करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर लाभार्थी निवड

या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनीकिटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांनी उपलब्ध बियाणांचा योग्य वापर करून वेळेवर पेरणी करावी आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande